महाराष्ट्रा ठाकरे गटाला खिंडार पाडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा इतर राज्यात वळवला आहे. एकनाथ शिंदे यांनी आता थेट राजस्थानातच राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे. राजस्थानातील काँग्रेसचा एक बड्या आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या खास विश्वासू नेत्याने थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर महाराष्ट्रानंतर आता राजस्थानातही शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजस्थानच्या झुनझुनमध्ये गेले होते. यावेळी झालेल्या जाहीर आणि भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या हातात शिवधनुष्य देऊन त्यांना शिवसेनेत घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केलं. शिंदे यांनी सुरुवातीला राजस्थानी भाषेतून भाषण करत यावेळी उपस्थितांची मने जिंकली.
आपला गुण एकसमानच
राजेंद्र गुढा यांचं शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राजस्थान ही वीरांची भूमी आहे. इथल्या जनतेला नमन करतो, अभिवादन करतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे महाराणा प्रताप यांचं नाव गाजलंय. राजस्थान आणि महाराष्ट्राचा स्वभाव गुण एकसारखा आहे. तो म्हणजे वीरता, शूरता, एकसमानता हा होय. आता या गुणाचं मिलन झालंय, असं एकनाथ शिंदे म्हमाले.बाळासाहेबांच्या विचारासाठी…
मी एवढंच सांगेन की मागच्या वर्षी इथले मुख्यमंत्री अशेक गेहलोत आले होते. त्यांनी सांगितलं होतं की, तुमच्यामुळे मी मुख्यमंत्री झालोय. पण त्यांनीच तुमचं मंत्रीपद काढून घेतलं. याचं उत्तर जनता त्यांना देईल. तुम्ही मंत्रीपद सोडलंत. पण सत्य सोडलं नाहीत, यासाठी तुमचं कौतूक. तुम्ही जसं मंत्रीपद त्यागलं, तसंच मी देखील सत्ता सोडली. मंत्रीपद सोडलं आणि केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्येचा त्याग केला, असं सांगतानाच आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालतो, असं शिंदे म्हणाले.
मी तुमचा हात धरलाय
यावेळी राजेंद्र सिंह गुढा यांनीही मनोगत व्यक्त केलं. इथेही उद्योगधंदे येतील. रोजगार मिळतील अशी आशा आहे. मी तुमचा हात धरला आहे. इथे बाण चालेल. जोरदार चालेल. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापाच्या विचाराने आपण काम करू. या राज्यात शिवसेना पसरवू. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलंय. तुमचं स्वागत आणि अभिनंदन आहे, असं राजेंद्र सिंह गुढा म्हणाले.