सांगली, शहरातील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या विकास चौक येथील फोटो स्टुडिओचे दुकान फोडून चोरट्यांनी चोरी केली. दुकानात ठेवलेले महागडे कॅमेरे आणि सीसीटीव्ही संच असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सदर चोरीची घटना हि शनिवार ता. ९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी विनय दत्तात्रय जोशी (वय ४० रा. सुभाषनगर, मिरज) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विनय जोशी हे आपल्या कुटुंबियांसह मिरजेतील मालगाव रोडवरील सुभाषनगर येथे राहतात. सांगलीतील अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज जवळील विकास चौक येथे फोटो स्टुडिओ आणि कॅफेचे दुकान आहे. शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करून विनय जोशी हे घरी गेले होते. यावेळी शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी कॅफे आणि फोटो स्टुडिओचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दुकानात ठेवलेले फोटो ग्राफीचे आणि शूटिंगचे १ लाख ७० हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा अल्फा ७ ए, एस थ्री कॅमेरा, आणि मेमरी कार्ड, सोनी कंपनीची झेसिस कॅमेरा लेन्स, २२ हजार रुपये किमतीचा एक निकॉनच्या दोन लेन्स, १८ हजार १३५ रुपयांसह इतर साहित्य आणि ८ हजारांचे सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर असा एकूण २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना उघडकीस आली. यानंतर जोशी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाण्यात वारंवार चोरी व घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण आहेत.