देशभरातील नागरिकांना सध्या विविध सणांचे वेध लागले आहेत. सणासुदीच्या निमित्ताने देशभरात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे आपल्या देशातील अर्थचक्राचा देखील खूप मोठा हातभार लागतो. त्यामुळेच येणाऱ्या सणांसाठी विविध कंपन्या देखील सज्ज झाल्या आहेत. परिणामी सणासुदीच्या लोडमुळे कंपन्यांमध्ये हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळेच चालू वर्षी 7 लाखांपेक्षा अधिक हंगामी कर्मचाऱ्यांची भरती केली जाण्याची अपेक्षा आहे.
गतवर्षी आयटी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी नारळ दिला होता. मात्र यावेळी आता सणासूदांमुळे आयटी आणि टेक कंपन्या डिसेम्बरपर्यंत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करतील असा अंदाज वर्तवला जातोय. चालू वर्षी आयटी क्षेत्रात 44 टक्के नोकर भरती वाढेल असा अंदाज मॅनपॉवर एम्प्लॉयमेंट आऊटलूकने एका सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर ई-कॉमर्स क्षेत्रात डिलिव्हरीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी देखील 40 टक्क्यांनी वाढलीये. परिणामी या क्षेत्रातील आणि लॉजिस्टिक कंपन्या हजारोंच्या संख्येने हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत. त्यातील बऱ्याच हंगामी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या कंत्राटी पद्धतीने होतील, असं मत तज्ज्ञांनी मांडलंय.