जयसिंगपूर, शहरातील पाचव्या गल्लीतील रमेश रतनलाल बलदवा यांचे बंद घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह चांदी आणि रोकड असा अंदाजे ३३ लाखाहून अधिक मुद्देमालावर हात मारला. ऐन गणेशोत्सवात झालेल्या या धाडसी चोरीमुळे घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून श्वान घराच्या परिसरातच घुटमळले.
जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील पाचव्या गल्लीत स्वामी समर्थ मंदिरजवळ रमेश बलदवा यांचा बंगला आहे. ते आपल्या परिवारासह ऋषी पंचमीनिमित्त रक्षाबंधन साजरे करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) गेले होते. या संधीचा फायदा घेत सोमवारी (ता.१८) दुपारी चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.
बंगल्यातील कपाटातील सोन्याचे गंठण, जेन्स ब्रेसलेट, लेडीज ब्रेसलेट, कानातील टॉप्स, सोन्याच्या चेन, नाकातील नथ, हातफुल, पाच सोन्याचे खड्यांचे सेट. सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे बाजूबंद, बिंदी, कच्चे सोन्याचे तुकडे यासह विविध दागिने असा एकूण ४० तोळ्याहून अधिक मुद्देमाल असा २३ लाख ६० हजार तर चांदीची नाणी, पैंजण, पुजेचे साहित्य, ताट, तांब्या असे एकूण ५ किलोहून अधिक चांदीचे साहित्य असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयाचा मुद्देमाल त्याचबरोबर रोख ६ लाख रुपये असा एकूण ३३ लाख १५ हजार रुपयाहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.
सोमवारी रात्री बंगल्याजवळ बांधकामावर पाणी मारण्यासाठी योगेश बलदवा गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर श्वानपथक, ठसेतज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व जयसिंगपूर पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोघे संशयीत दिसून आले आहेत. त्याचबरोबर शहरातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबतची फिर्याद योगेश रतनलाल बलदवा यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, सोमवारी दुपारी ही चोरीची घटना घडली आहे. रात्री हा प्रकार उघडकीस आला असून पहाटे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४० तोळ्याहन अधिक सोन्याचे दागिने, ५ किलोहून अधिक चांदीचे दागिने व साहित्य व रोख ६ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे जयसिंगपूर पोलिस गुन्हे अन्वेषण यांच्याकडे गतीने तपास करीत आहेत.