मुलगा होत नसल्याने सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटालून दोन मुलींची आई असलेल्या विवाहिताने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) करवीर तालुक्यातील सडोली खालसात घडली. अस्मिता केदारी चौगले (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असे या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मृत विवाहिता अस्मिता चौगले यांचे वडील दगडू सदाशिव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि केदारी यांचा 13 वर्षांपूर्वी केदारी यांच्याशी विवाह झाला होता. केदारी आणि अस्मिता यांना अनुक्रमे 9 आणि 8 वर्षांच्या दोन मुली आहेत. त्यामुळे मुलगा होत नसल्याने पती, सासू आणि सासऱ्याकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून अस्मिताने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पतीने गळफास सोडवून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.