सांगलीत (Sangli News) डॉल्बीच्या दणदणाटामुळे सोमवारी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी गणेश चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आणखी एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ओळख सुद्धा पटलेली नाही. मात्र, या व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर गुरुवारी रात्री एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. या व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद आहे. डॉल्बीच्या दणदणाटामध्येच मिरवणूक पार पडली. त्यामुळे या दणदणाटामध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर मिरज पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी डॉल्बीच्या दणदणाटात मृत्युमुखी पडल्याच्चा घटना दोन दिवसापासून होत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) या तरुणांवर मृत्यू ओढवला होता. मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला.
यामधील शेखर पावशेची 10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. मिरवणुकीतील डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांपूर्वीच त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात भोवळ येऊन पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने तासगावला खासगी रुग्णालयात नेले; पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
प्रवीण शिरतोडेचा सेंट्रिंग व्यवसाय होता. परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने कामावरून घरी आल्यानंतर लगेचच मिरवणुकीत सामील झाला. दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसोबत त्याला नाचत असतानाच चक्कर आल्याने तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.