पाऊस आता लवकरच रामराम ठोकण्याची शक्यता आहे. पण त्याआधी तो त्याचं आक्राळविक्राळ रुप दाखवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. पाऊस आपल्या परतीच्या प्रवासाला लागणार आहे. पण त्याआधी अरबी समुद्रात हालचाली वाढल्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात यावर्षी ‘कभी खुशी, कभी गम’ अशा स्वरुपाचा पाऊस पडलाय. पावसाने अतिशय उशिराने एन्ट्री मारली. त्यानंतर पाऊस चांगलाच बरसला. काही दिवस बरसला. त्यानंतर पुन्हा त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर तो पुन्हा आला. पण नंतर ऑगस्ट महिन्यात त्याने जी सुट्टी घेतली तो शेवटपर्यंत आलाच नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं. अनेक नद्या कोरड्याठाक पडल्या. अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. सर्वसामान्य नागरीक, शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. अखेर त्यानंतर तो पुन्हा बरसायला लागला.
राज्यात सर्वदूर पाऊस पोहोचला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. तरीही मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही गेल्या आठवड्याभरात पडलेल्या पावसाने पाणीटंचाईची बरीच कसर भरुन काढलीय. अर्थात या दरम्यानच्या काळात पावसाचं आक्राळविक्राळ रुपही बघायला मिळालं. कारण नागपुरात अचानक मध्यरात्री ढगफुटी सारखा पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. नाग नदीला पूर आला. सुदैवाने काही काळाने परिस्थिती आटोक्यात आली.
पावसाचा मूड हवा तसा बदलत गेला. पण यावर्षीचा पाऊस आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. तसं असलं तरी तो परतत असताना काही भागांमध्ये चांगलाच कोसळण्याची शक्यता आहे. त्याचा परतीचा प्रवास लवकरच सुरु होणार आहे. पण या प्रवासात तो काहीसा दणका देण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.
अरबी समुद्रात सध्या चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झालीय. वारे प्रचंड वेगाने वाहत आहेत. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पण येत्या 24 तासात समुद्रातील चक्रिवादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात तसेच पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे गोव्यापासून कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस दणका देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाचा परतीचा प्रवास नेमकं कोणत्या तारखेपासून सुरु होणार याबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे. गोवा आणि कोकणात येत्या 48 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही होणार असून पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रातून जमिनीपर्यंत आल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरण शिवारात काल विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी सांजेगाव ते कावनई या दोन गावांच्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे येथे चक्रीवादळ सारखी वावटळ धरणात फिरताना आढळून आले. यातून धरणाचे पाणी आकाशात उडत होते. ही सर्व दृश्य येथील एका स्थानिक गावकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत.