नांदेड येथील शासकिय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली. यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे. यादरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.यानंतर डॉ शंकराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ थोड्याच वेळात नांदेडसाठी निघणार आहेत, मात्र या एकूणच घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच प्रत्येक मृत्यूचे कारण हे देखील स्पष्ट जाणून घेतलं जाणार आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई ही सरकारकडून केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. इतकेच नाही तर औषधांचा रुग्णालयात कुठलाही तुटवडा नसल्याची स्पष्टोक्ती देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.नांदेडला जातोय, कालच मी आयुक्त आणि संचालकांना पाठवलं आहे. आम्ह समिती स्थापन करतो आहोत. एक-एक मृत्यूची सखोल चौकशी करू आणि याला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करू असे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रिफ म्हणाले आहेत. ते एबीपी माझाशी बोलत होते.तसेच संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एका दिवसाता १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबद्दल मुश्रीफांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, घाटी रुग्णालयात रोज दोन हजार पेशन्ट येतात, तिथं पंधराशे ते सोळाशे पेशंट रोज ओपीडीला येतात. घाटीची माहिती देखील मी घेतो.