देशात आज आणि उद्या पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळणार आहे. देशात (India Weather Update) काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे. देशासह राज्यातूनही (Maharashtra Monsoon Update) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हवामाना विभागाच्या अंदाजानुसार, देशात रविवारपर्यंत देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातही विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत मात्र, तापमान वाढलं असून तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी 8 ऑक्टोबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भाग वगळता इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. राजस्थान, गुजरातसह देशाच्या विविध भागांतून मान्सूनं आधीच टाटा-बाय बाय केलं आहे. राज्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान मुख्यतः कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागांत हलका पाऊस ते रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत, शहर आणि आसपासच्या भागात तुलनेने कोरडी हवामान पाहायला मिळालं.
येत्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि पश्चिम भारताच्या काही भागात कोरडे हवामान राहण्याचा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे IMD ने म्हटलं आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्य तसेच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशातील काही भाग समाविष्ट आहेत.