Monday, July 28, 2025
Homeसांगलीसांगली: आटपाडी येथील सोनारसिध्दनाथ मंदिरातून सोन्या- चांदीचे दागिने लुटले

सांगली: आटपाडी येथील सोनारसिध्दनाथ मंदिरातून सोन्या- चांदीचे दागिने लुटले

 

 

आटपाडी तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुजारवाडी (आटपाडी) येथील श्री सोनारसिध्दनाथ मंदिरातील १०.५ तोळे सोन्याचे दागिने आणि १६ किलो चांदी असा सुमारे १६ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुजारवाडी (आटपाडी) येथे श्री सोनार सिद्ध मंदिर आहे. मंदिरातील देवाच्या अंगावरील दागिने नित्य नियमाने पुजाऱ्याने एका पिशवीत ठेवले होते. या गाभाऱ्याला कुलूप लावलेले नसते. काल रात्री मंदिरातील पुजारी शेजारती झाल्यावर मुख्य दरवाजा बंद करून झोपले.

 

या मंदिराला भिंतीचे कंपाऊंड आहे. मंदिरात आणि मंदिराच्या आवारात सहा पुजारी होते. रात्री ११ ते पहाटे ४ दरम्यान बंद न केलेला मुख्य दरवाजा उघडून किंवा भिंतीवरून मंदिराच्या आवारात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. झोपलेल्या पुजाऱ्यांना खबर न लागू देता चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यात एका पिशवीत ठेवलेली सोन्याची बोरमाळ, गंठण, लक्ष्मीहार, फुले, लहान मोठी डोरली असे १०.५ ग्रॅम सोने तसेच चांदीचा सहा किलोचा घोडा, सहा किलोचा फेटा, दोन किलोची नाण्यांची माळ, गणपती, चांदीचा छोटा घोडा, करदोडे, बोरमाळ असे १६ किलोचे दागिने घेऊन पोबारा केला.

 

पहाटे पुजाऱ्यांना जाग आल्यानंतर चोरी झाल्याचे समजले. घटनास्थळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, अनिल पाटील, उपविभागीयपोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली. ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने मंदिरासमोरील रस्त्यापर्यंत मागोवा काढला. परंतु चोरांचा सुगावा लागला नाही.

 

सोनार सिध्दनाथ मंदिरात कोणती सुरक्षा व्यवस्था नाही. सीसीटीव्ही सध्या बंद आहेत. हे लक्षात घेऊन चोरांनी मंदिरातील माहिती घेऊन ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत नामदेव आप्पा पुजारी (वय ७२ रा.देशमुखवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करत आहेत.

 

दरम्यान, आटपाडी शहर आणि उपनगरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बंद घरे फोडली जात आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -