मराठा आरक्षण देण्यासाठी पुरावे मिळत नव्हते; पण समितीने 5000 पुरावे आणले आहेत. आता कायद्याला आधार द्यायला व कायदा पारित करायला सरकारला अडचण नाही. सरकारने 40 दिवसांत कायदा पारित करावा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत.आता सरकार आरक्षण देणार व मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. धीर धरा सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल, असे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
जामखेड येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांची आज सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, ‘1 जून 2004 आरक्षणाचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. मराठा कुणबी एकच आहे. गायकवाड कमिशनने मराठय़ांना मागास सिद्ध केले आहे. सरकारसमोर आता कुठलीही अडचण नाही; पण सरकार व समिती दिशाभूल करत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला मराठा हाच वेगळा प्रयोग तयार करून 50 टक्क्याच्या आत आरक्षण सरकार देऊ शकते. ज्या कायद्यात मराठय़ांचे हित नाही, तो कायदा पारित केलेला आम्ही स्वीकारणार नाही. मी दिलेल्या शब्दात कुठेही बदलणार नाही व सरकारलाही बदलू देणार नाही. होणारा विजय महाराष्ट्रातील मराठय़ांचा असणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. सरकार आपल्याकडून एक महिन्याचा वेळ घेऊन गेले. 14 ऑक्टोबरला सरकारचा एक महिना पूर्ण होणार आहे. त्यात आपण सरकारला आणखी 10 दिवस दिले आहेत. 24 ऑक्टोबरला सरकारला दिलेला 40 दिवसांचा वेळ पूर्ण होत आहे. सरकार आणि समितीची पळापळ सुरू आहे. आपण आपल्या शब्दांवर ठाम आहोत, जिवंत असेपर्यंत ठाम राहणार. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मराठा समाजाशी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही. सरकारने कितीही डाव टाकू द्या; सर्व डाव उधळून लावणार, आरक्षण घेतल्याशिवाय आता सरकारला सुट्टी नाही, असे जरांगे पाटील यांनी निक्षून सांगितले