मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता पवार काका-पुतण्यांनाही बसणाराय. मराठा समाजानं राजकीय नेत्यांना गावागावात प्रवेशबंदी केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला 10 दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात बंदी करा, असं आवाहनही जरांगेंनी केलं होतं. त्याचा फटका आता चक्क पवार काका-पुतण्यांना बसणाराय.
पवारांना ‘नो एन्ट्री’
येत्या 23 ऑक्टोबरला सोलापुरात पिंपळनेर साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार येणार आहेत. मात्र अजित पवारांना पिंपळनेरमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजानं घेतलीय. तर त्याचदिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडीत शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत. मात्र पवारच काय, कुणाही नेत्याला सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय.
मराठा आरक्षणासाठीचं जरांगेंचं आंदोलन चांगलंच तापलंय. या लढ्याची झळ आमदार, खासदार आणि बड्या नेत्यांना बसू लागलीय. त्यातून पवार काका-पुतणेही सुटलेले नाहीत. बारामतीनंतर शरद पवारांचं सर्वाधिक प्रेम आहे ते सोलापूर जिल्ह्यावर. 2009 मध्ये पवार माढामधून खासदार झाले होते. आता त्याच जिल्ह्यात पवारांना प्रवेशबंदीचा इशारा दिला जातोय, यावरून जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता किती वाढलीय, याची कल्पना yeil येईल.
मराठी आंदोलकाची आत्महत्या
मराठा आरक्षण आंदोलक सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केलीय. सुनील कावळे हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी होते. जालन्यात झालेल्या मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनात सक्रिय होते. मराठा आरक्षण मोर्चासाठी मुंबईत जातो, असं त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यांनी मुंबईत बीकेसीमध्ये उड्डाणपूलाला लटकून गळफास घेत आत्महत्या केली. सुनील कावळे यांनी रात्री बाराच्या सुमाराला त्यांच्या गावातल्या मित्रांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणार असल्याची सुसाईड नोट पोस्ट केली होती. मात्र रात्री कुणीही ती पोस्ट पाहिली नाही. सकाळी सुनील कावळे यांनी आत्महत्या केल्याचं समजताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 45 वर्षांचे सुनील कावळे हे रिक्षाचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लग्न झालेली मुलगी आणि मुलगा आहे.
सुनील कवळेंच्या आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक झालेत. सरकारमुळेच बळी जातायत, असा आरोप जरांगेंनी केलाय. तर आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसेल तर परिणाम तीव्र होतील असा इशारा विनोद पाटलांनी सरकारला दिलाय.मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्या घरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी भेट दिली आणि कुटुंबाचे सात्वन केलं.
मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेची झळ नेत्यांना, काका-पुतण्यांना प्रवेशबंदी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -