‘एक से भले दो!’ असे म्हणत व्हॉट्सअॅपने आपल्या युजरला एक मोठी ‘अॅप’डेट दिली आहे. ती म्हणजे, एकाच मोबाईलवर आता दोन व्हॉट्सअॅप अकाउंट वापरता येणार आहेत. तुम्ही बरोबर वाचताय. अगदी इंस्टाग्रामसारखे व्हॉट्सॲपवरही आता तुम्ही एका क्लिकमध्ये दुसऱ्या अकाउंटवर स्विच होऊ शकाल.
व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉगद्वारे ही माहिती दिली. युजरला हे अपडेट मिळण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत सर्वांना हे अपडेट उपलब्ध होईल.
मेसेजिंगसाठी लोकप्रिय ॲप असलेल्या व्हॉट्सॲपने नुकतेच या धमाकेदार अपडेटची घोषणा केली. युजर्सच्या सुरक्षेचा विचार करता हे अपडेट देण्यात आले आहे. या अपडेटमुळे फेक व्हॉट्सॲप व्हर्जन वापरण्याची किंवा दुसरे डिव्हाइस सोबत बाळगण्याची आवश्यकता युजरला भासणार नाही.
यामुळे युजरचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होईल. सध्या हे अपडेट ॲण्ड्राइड युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, आयओएस युजर्ससाठी हे अपडेट कधी येणार, याबद्दल व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलेले नाही.
कशी वापराल दोन अकाउंट?
युजरला एकाच डिव्हाइसमध्ये व्हॉट्सॲपची दोन अकाउंट वापरायची असल्यास दुसरा संपर्क क्रमांक असलेले सिम कार्ड मोबाईलच्या दुसऱ्या सिम स्लॉटमध्ये टाकावे लागेल. यानंतर व्हॉट्सॲपमध्ये आवश्यक सेंटिंग्ज करून दोन्ही अकाउंट वापरता येतील. याचा सर्वाधिक फायदा युजरला त्यांचे वैयक्तिक आणि कार्यालयीन कामासाठीचे व्हॉट्सॲप मेसेज वेगवेगळे करण्यासाठी होईल.
काय आहे सेटिंग?
व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये जा.
तुमच्या नावासमोरील बाणावर .
‘ॲड अकाउंट’वर .
नवीन नंबर ॲड करा.
तुमची प्रायव्हसी आणि नोटिफिकेशन सेटिंग्स करून घ्या.
यानंतर तुमचे नवीन अकाउंट ॲड होईल.
सेल्फ-डिस्ट्रक्टिव व्हॉइस मेसेज
व्हॉट्सॲपने काही वर्षांपूर्वी ‘व्हीव वन्स’ हे फीचर दिले होते. या फीचरद्वारे युजरने सेंड केलेला फोटो केवळ एकदाच पाहता येतो. हेच फीचर आता व्हॉइस नोटसाठी देण्यात येणार आहे. या फीचरद्वारे रिसिव्हर केवळ एकदाच व्हॉइस नोट मेसेज ऐकू शकतील.