‘बिग बॉस ओटीटी’ फेम आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते, पण त्यामुळे तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ती पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. उर्फीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरला झाला आहे, ज्यामध्ये पोलिस तिला ताब्यात घेताना दिसत आहेत.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका कॅफेमध्ये दिसत आहे. तेवढ्यात तिथे दोन महिला पोलिस पोहोचल्या आणि त्यांनी उर्फीला त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं. पण हे काय आहे, अस का करताय, असा प्रश्न उर्फीने त्यांना विचारला. छोटे कपडे घातल्याचे कारण सांगत त्या महिला पोलिसांनी तिला त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. मात्र ही माझी मर्जी आहे, मी मला पाहिजे ते कपडे घालू शकते असं सांगत उर्फी तिचा बचाव करताना दिसते.
तुला जे बोलायचं आहे ते पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बोल, असं सांगत त्या दोन्ही महिला पोलिस तिला एका काळ्या कारमध्ये बसवतात आणि ते सर्व निघून जातात, असं त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तिचा हा व्हिडीो पाहून उर्फीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर काही सोशल मीडिया युजर्स तर पोलिसांसोबत असल्याचे दिसत आहे. अनेकांनी उर्फीच्या कपड्यांबद्दल आक्षेप नोंदवत तिला तुरूंगात डांबले पाहिजे अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींना पोलिसांची ही कारवाई योग्य वाटलीय.
सध्या एकीकडे उर्फीच्या अटकेची बातमी सर्वत्र पसरली आहे. तर हे फक्त नाटक आहे अशा कमेंट्स सोशल मीडियावर अनेक जण करत आहेत. युजर्सना हा उर्फीचा नवीन ड्रामा वाटत आहे. त्या पोलिसही बनावट आहेत, असेही अनेकांचं म्हणणं आहे. ज्या कारमधून त्यांना नेण्यात आले ती गाडी पोलिसांची नाही, असेही काही जणांनी लिहीलं आहे. पण आता या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.
काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. खरंतर हॅलोवीन पार्टीसाठी तिने बॉलिवूड चित्रपटातील एका भूमिकेसारखा वेश केला होता. ही भूमिका होती ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटातील छोटा पंडितची. अभिनेता राजपाल यादवने ही भूमिका साकारली होती. तसाच लूक उर्फीने केला. मात्र तो लूक तिला फार महागात पडला.