माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा
लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. बारामतीमधील जनताही आमच्या सोबत आहेत. आता माझे वय ८६ झाले आहे. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे, हे बोल आहेत, अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे. राज्यातील ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली. अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदान केले. त्यानंतर आशाताई पवार यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. लोकांनी भरभरुन प्रेम दिले. त्यामुळे आता ‘दादा’ने मुख्यमंत्री व्हावे, हीच आपली इच्छा राहिल्याचे त्यांनी सांगितले.
काटेवाडीत विजय निश्चित
काटेवाडी ग्रामपंचायतीवर अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु या वर्चस्वाला आता सत्तेत एकत्र असलेल्या भाजपकडून आव्हान दिले आहे. परंतु गावातील लोक आपल्या सोबतच आहे. आमचा विजय निश्चित आहे, असे आशाताई पवार यांनी सांगितले. मी काटेवाडीत आली तेव्हा गावात काहीच नव्हते. त्यानंतर सूनबाईने गावासाठी काम केले. आता खूप बदल झाले.