महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने स्वस्त दरात पीठ विकण्यास सुरुवात केली आहे.
सरकार ‘भारत ब्रँड’ अंतर्गत पीठ विकणार आहे. पिठाची किंमत काय असेल आणि तुम्ही ते कुठून खरेदी करू शकाल, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
किती आहे किंमत?
‘भारत’ ब्रँड अंतर्गत पीठ 27.50 रुपये प्रति किलो विकले जात आहे. सध्या बहुतांश ब्रँडेड पिठाची किंमत 40 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. त्यातही अन्नपूर्णा ब्रँडच्या पिठाची किंमत 60 रुपये किलोपर्यंत आहे. हे पीठ खरेदी केल्यास ग्राहकांची 13 ते 33 रुपये प्रति किलो बचत होईल.
कुठून करू शकता खरेदी?
तुम्ही केंद्रीय भंडार, NAFED, NCCF च्या सर्व मोबाईल आउटलेटवरून ‘भारत’ ब्रँडचे पीठ खरेदी करू शकता. यासाठी सरकार देशभरातील 800 मोबाईल व्हॅन आणि 2,000 हून अधिक दुकाने वापरणार आहे. सरकार याचा विस्तार इतर सहकारी/किरकोळ दुकानांपर्यंत करेल. म्हणजे येत्या काही दिवसांत हे पीठ तुम्हाला सहज मिळू शकेल.
फेब्रुवारी महिन्यात, किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत, सरकारने काही दुकानांमध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून 18,000 टन ‘भारत आटा’ची प्रायोगिकपणे 29.50 रुपये प्रति किलो दराने विक्री केली होती. आता त्याची औपचारिक सुरुवात झाली आहे.
डाळींचीही विक्री
भारत डाळ (चना डाळ) या 3 एजन्सींद्वारे किरकोळ दुकानांमधून 1 किलो पॅकसाठी 60 रुपये प्रति किलो आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. कांदाही 25 रुपये किलो दराने विकला जात आहे. आता ‘भारत’ पिठाची विक्री सुरू झाल्याने ग्राहकांना या दुकानांतून मैदा, डाळी आणि कांदा परवडणाऱ्या किमतीत मिळू शकेल.