दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अजित पवार हे डेंग्यूमुळे मागील काही दिवसांमध्ये आजारी होते आणि डॉक्टारांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला होता. मात्र त्यानंतरही ते अचानक दिल्लाला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. शिवाय यावर विविध प्रतिक्रियाही उमटल्या.
दरम्यान अजित पवार गटाने अमित शहा यांची नेमकी कशासाठी भेट घेतली आणि काय चर्चा झाली याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आता यासंदर्भात काही माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाने अमित शाहांकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सत्तावाटप योग्य प्रकारे झाले, तरच निवडणुकीत यश मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ला निवडणुकीत यश अपेक्षित असेल, तर लवकर कामाला लागणे गरजेचे आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना सांगितल्याचे समजते.
याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा, असाही अजित पवार गटाचा सुरुवातीपासूनच आग्रह आहे. तसेच महामंडळाबाबत नेमणुकांचा विषय मार्गी लावला जावा. अशी विनंतीही करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याचबरोबर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज नाराज होत असल्याने, आगामी निवडणुका पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. तरी ओबीसी समाजाकडे लक्ष दिले जावे. अशीही मागणी अमित शहांकडे केली गेल्याचे समजते.