तुम्हाला जर बँकेशीसंबंधित महत्त्वाचे काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. कारण ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने पुढील महिन्यात अनेक दिवस बँकांमध्ये संपाची (Bank Strike) घोषणा केली आहे.त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्या लोकांनी याबाबतची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संप करणार आहेत.
डिसेंबरमध्ये अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद राहू शकते. कारण पुढील महिन्यात अनेक दिवस विविध बँकांमध्ये संप असणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने यासंदर्भात अधिसूचना जारी करुन ही माहिती दिली आहे. AIBEA ने डिसेंबर 2023 मध्ये वेगवेगळ्या तारखांना बँकांमध्ये संप जाहीर केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा संप 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत सुरु होईल. त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरु होण्यापूर्वी नागरिकांनी याची माहिती घेणं गरजेचं आहे.
जाणून घ्या कोणत्या दिवशी बँकांमधील कामकाज राहणार बंद
4 डिसेंबर 2023- स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेत संप असेल.
5 डिसेंबर 2023- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियामध्ये संप असेल.6 डिसेंबर 2023- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये संप होणार आहे.
7 डिसेंबर 2023- इंडियन बँक आणि युको बँकेत संप असेल.
8 डिसेंबर 2023- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये संप होणार आहे.
9 आणि 10 डिसेंबर 2023- बँकांमध्ये शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी.
11 डिसेंबर 2023- खासगी बँकांमध्ये संप होणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय?
बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामागील मुख्य कारण म्हणजे बँकेत पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करावी. यासोबतच बँकिंग क्षेत्रातील आऊटसोर्सिंगवर बंदी घालून कायमस्वरुपी नोकऱ्यांची संख्या वाढवणे आदी मागण्यांचाही समावेश आहे. या प्रकरणाची माहिती देताना एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, गेल्या काही वर्षांत बँकांमध्ये खालच्या स्तरावर आऊटसोर्सिंगचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत तात्पुरते कामगार वाढल्याने ग्राहकांची वैयक्तिक माहितीही धोक्यात आली आहे.