राज्यातील जिल्हा एसटी स्थानकांवर(decision) आपला दवाखाना आणि प्रत्येक एसटी स्थानकावर महिला बचत गटांसाठी एक स्टॉल सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी येत्या वर्षभरात महामंडळाच्या ताफ्यात ३,४९५ बस दाखल करण्यासही त्यांनी मंजुरी दिली.
प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात (decision) नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २२०० तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्याच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. एकूण एसटी स्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी मृत्यू झालेल्या माजी सैनिकांच्या पत्नींना दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल द्यावा आणि यासाठी योजनाबद्ध अमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीला परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. २० नोव्हेंबरला महामंडळाने मिळवलेल्या ३६.७३ कोटी रुपयांच्या विक्रमी उत्पन्नाबद्दल त्यांनी महामंडळाचे अभिनंदन केले. सर्वसामान्यांना एसटीद्वारे गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.