दिवाळीच्या पार्श्वभुमीवर बंद पडलेला वस्त्रनगरीतील खडखडाट पंधरा दिवसानंतर हळूहळू पुर्ववत होऊ लागला आहे. उद्या शनिवार ता. २५ पासून बंद असलेले साधे यंत्रमाग सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणासह पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर कापडाला मागणी येईल, अशी आशा व्यवसायिकांतून व्यक्त केली जात आहे. सध्या कापडाचे सौदे नसले तरी बाजारपेठेमध्ये चौकशी सुरू असल्याचे चित्र आहे. सुताचे दर स्थिर आहेत.
तर कापसाला म्हणावा तसा दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
वर्षभरातील सर्वात मोठा दिवाळी सण वस्त्रनगरीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर शहरात कोट्यावधीची उलाढाला होते. यंदा दिवाळीतील महत्वाचा सण लक्ष्मीपुजनाचा दिवस रविवार ता. १२ नोव्हेंबर रोजी आला होता. त्यामुळे शहर परिसरातील वस्त्रोद्योगासह यंत्रमाग कामगारांच्या हाती शुक्रवार ता. १० रोजी बोनसची रक्कम मिळाली होती. केवळ साधे व ऑटोलूम वरील यंत्रमाग कामगार दिवाणजी, वहिफणी, कांडीवाला आदिंचा विचार करता त्यांच्या हाती सुमारे ६५ ते ७० कोटी रूपये बोनसपोटी मिळाले होते. बोनसची रक्कम घेतल्यानंतर कामगारवर्ग दिवाळीला सुट्टी घेतात. दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतर शहर परिसरातील साधे व ऑटोलूम पुर्ववत सुरू होत असल्याचे चित्र आहे.
दिवाळी सणाच्या अगोदर वस्त्रोद्योगामध्ये मोठी मंदी आली होती. कापडाला मागणी व दर मिळेल, अशी अपेक्षा यंत्रमागधारकांची होती मात्र बाजारपेठेमध्ये कोणतीही आशेचे चित्र दिसले नाही. राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आदि पाच राज्यांच्या निवडणुकांचे वारे शांत झाल्यानंतर कापडाला मागणी येईल, असे जाणकारातून बोलले जात आहे.