इचलकरंजी शहर आणि परिसरात पारंपारीक पद्धतीने मोठ्या उत्साहात तुळशी विवाह साजरा करण्यात आला. सायंकाळनंतर दारोदारी ठेवलेल्या तुळसी भोवती केलेली आरास सडा, रांगोळ्या यामुळे वातावरणात मांगल्य निर्माण झाले होते. उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येत होती.
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिकी द्वादशीला पारंपारीक पद्धतीने तुळसी विवाह साजरा करण्यात येतो. शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात सायंकाळनंतर तुळसी विवाहाची लगबग सुरू होती. विविध भागात दरवाजासमोर तुळसी ठेवून विवाह सोहळा साजरा करताना अबालवृद्ध दंग झाले होते. महिलाही पारंपारीक पोषाखात दिसत होत्या. तुळशीभोवती उभारलेले ऊस, त्याभोवती केलेली रोषणाई, आकर्षकरित्या काढलेली रांगोळी आणि मंत्रोच्चरात पार पडलेला तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला.
तुळसी विवाहासाठी लागणाऱ्या आवश्यक पुजा साहित्याचा बाजार मुख्य रस्त्यावर भरला होता. ऊस, चिंचा, आवळा व नागवेलीची पाने तसेच अन्य साहित्य देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. झेंडुच्या फुलांची मोठी आवक होती.