मराठवाड्यातल्या हिंगोली येथे रविवारी ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. परंतु हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला आहे.
‘टीव्ही ९ मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. स्वराज्य संघटनेने सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्याने सभास्थळी आणि नांदेड विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.सकाळी १० वाजता नांदेड विमानतळावर छगन भुजबळ यांचं आगमन होणार आहे. जालना येथील सभेमध्ये त्यांनी केलेल्या आक्रमक भाषणामुळे ओबीसी नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज (रविवारी) भुजबळ काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सभेसाठी जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु रविवारी ते हैदराबादकडे रवाना झाले आहेत. छगन भुजबळ हे नांदेडवरुन कारने हिंगोलीकडे रवाना होणार आहेत.मागच्या काही दिवसांपासून भुजबळांच्या भाषणावर नाराजी जाहीर झाली होती. अजित पवार यांनीही समज दिल्याचं खुद्द भुजबळांनी कबूल केलं. त्यामुळे भुजबळ आज सौम्य भूमिका घेतात का, हे बघावं लागेल.