भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी याने खऱ्या आयुष्यातील हिरोचे काम करुन दाखवले आहे. अपघातातील लोकांच्या मदतीसाठी शमी देवदूतासारखा धावून गेला आहे. शमीने स्वत:च या घटनेचा व्हिडिओ शेअर करुन या संदर्भातील माहिती दिली आहे. त्याच्या या कृतीमुळे त्याचे कौतुक होत आहे. (Mohammed Shami turns do gooder saves motorist who met with accident in Nainital)शमी उत्तराखंडच्या नैनीतालकडे निघाला होता. वाटेमध्ये त्याला अपघात झालेली गाडी दिसली. यावेळी शमीने आपली कार थांबवत आपल्या मित्राच्या मदतीने अपघातग्रस्त गाडीतील लोकांची मदत केली.त्यांची गाडी दरीमध्ये गेली होती. यावेळी त्यांना बाहेर काढण्याचे काम शमी आणि त्याच्या मित्रांनी केले. व्हिडिओमध्ये शमी जखमींना फर्स्ट एड मदत देतानाही दिसत आहे. व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे.शमीने ३१ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक गाडी दरीमध्ये गेल्याचे दिसत असून शमी अपघातग्रस्त लोकांची मदत करत आहे. शमी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणाला की, कोणाला तरी वाचवल्याचा मला खूप आनंद होत आहे. मला कोणाची तरी मदत केल्याचे समाधान आहे.दरम्यान, वर्ल्डकपमधील मोहम्मद शमीची कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने वर्ल्डकपमध्ये 24 विकेट्स घेतल्या. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो गोलंदाज ठरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शमीने पहिला विकेट घेऊन सामन्यात उत्साह आणला होता. मात्र, भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.