वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पुन्हा रिसेट होण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने बुधवारी राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफच्या करारात वाढ करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून BCCI ने घेतलेल्या निर्णयानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) निर्णयाकडे.
भारतीय संघ या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिथे टीम इंडिया ३ वन डे , ३ ट्वेंटी-२० व २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहलीने त्याचा मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी या दौऱ्यापुरता विचार करू नका असे बीसीसीआयला कळवले आहे. त्यामुळे तो थेट कसोटी मालिका खेळण्यासाठी आफ्रिकेत पोहोचेल. पण, रोहितचं काय?
वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती आणि सलग १० सामन्यांत विजय मिळवून फायनलपर्यंत पोहोचले होते. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमानांपेक्षा चांगला खेळ करून बाजी मारली. पण, रोहितच्या टीमवर बीसीसीआय आनंदी आहे. त्यामुळेच २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती केली. त्याचबरोबर आता ३५ वर्षीय रोहितनेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व करावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे.
रोहित व विराट २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर या फॉरमॅटपासून दूर आहेत आणि नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवली गेली होती. पण, आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये रोहितनेच नेतृत्व करावे, असा जोर बीसीसीआय धरत आहे. त्यासाठी रोहितच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहे. त्यात हार्दिक पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. जून २०२४ पर्यंत व्यवस्थापनाला ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वात स्थिरता हवी आहे. वन डे वर्ल्ड कपमध्ये जखमी झालेला हार्दिक आता थेट आयपीएल २०२४ मधून पुनरागमन करणार आहे. अशा परिस्थितीत रोहितचे मन वळवण्यास बीसीसीआयला यश आल्यास तोच वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करताना दिसेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज संघ जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.








