महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून ही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राजेश टोपे यांची गाडी बँकेच्या आवारात उभी होती. या गाडीवर दगडफेक झाली. राजेश टोपे यांनी या घटनेनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या प्रकरणी आज बिनविरोध निवडणुकीची सुद्धा प्रक्रिया पार पडली. पण काही असंतुष्ट लोकांनी मुद्दाम गाडीवर दगडफेक केली. यामध्ये गाडीचा काच फुटला”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.“असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूक बिनविरोध पार पडलेली असताना ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन काम केलं असेल त्यांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे”, असं मत राजेश टोपे यांनी मांडलं.
‘गाडीचा ड्रायव्हर आतमध्ये असताना दगडफेक’
“दगडफेकीची घटना घडली तेव्हा गाडीचा ड्रायव्हर आतमध्ये होता. त्याच्या जीवावर बेतलं होतं. आम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वरच्या मजल्यावर होतो. तर ड्राईव्हर गाडीत होता”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. यावेळी राजेश टोपे यांना मराठा आंदोलकांनी दगडफेक केली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाही, असं उत्तर दिलं. “मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्याचा काहीच विषय नाही. त्याचा अजिबात संबंधच नाही. हा निवडणुकीचा विषय आहे”, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.दगडफेक करणारे आमदार लोणीकर यांची माणसं?
“आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश टोपे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. भाजपचे जावळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सर्वांनी मिळून ही निवड केली. पण काही दृष्ट लोक असतात, कदाचित आमदार लोणीकर यांच्या लोकांनी ही कृती घडवून आणल्याची शक्यता आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, असं राजेश टोपे म्हणाले.