मृत सवतीने केलेली करणी दूर करण्यासाठी अघोरी उपचार करणाऱ्या भोंदूला रविवारी आष्टा पोलिसांनी अंदश्रद्धा निर्मुलन समितीच्या तक्रारीनंतर दरबारातून ताब्यात घेतले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे कारंदवाडी (ता. वाळवा) येथे प्रकाश विष्णू शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा त्याच्या रहाते घरी दर गुरुवार, रविवार व अमावस्येच्या दिवशी दरबार भरवून लोकांच्या समस्यांवर दैवी, अघोरी व जादुटोणा करून उपाय सुचवून अंधश्रद्धा पसरवितो अशी एक निनावी तक्रार आली होती. त्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर रविवारी अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले साध्या वेषातील पोलिसासह मांत्रिक प्रकाश विष्णू शेंबडे पाटील ऊर्फ मामा (रा. कारंदवाडी) यांच्याकडे गेले. धनाले यांनी ‘माझ्या मृत सवतीचा त्रास वाढलेला आहे. स्वप्नात येते. त्रास देते असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी भंडाऱ्याच्या रिंगणात बसवून कपाळावर भंडारा लावून, जिभेवर भंडारा टाकून आता तुम्हाला बरे वाटेल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मंतरलेला ताईत दिला व डॉक्टरांची औषध घेवू नका म्हणून सांगितले.इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवण्यास सांगितले. याच दरम्यान आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधौंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत आदींनी पथकासह दरबारात जाऊन भोंदूला ताब्यात घेतले. अघोरी उपायासाठी वापरणारे ताईत गंडेदोरे, भंडारा, लिंबू अशा वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. प्रकाश पाटील उर्फ मामाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध आष्टा पोलीस स्टेशनमध्ये जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.