दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. जगदीश प्रताप बंडारी असं या अभिनेत्याचं नाव असून त्याने चित्रपटात पुष्पाचा मित्र केशवची भूमिका साकारली होती. पंजागुट्टा पोलिसांनी जगदीशला अटक केली असून त्याच्यावर एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 30 वर्षीय जगदीश हा एका ज्युनिअर आर्टिस्टसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. संबंधित महिलेनं 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी जगदीशवर आरोप केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आणि पुढील तपास केल्यानंतर बुधवारी पोलिसांनी अभिनेत्यावर अटकेची कारवाई केली.
नेमकं काय घडलं?
संबंधित महिलेनं 29 नोव्हेंबर रोजी आपलं आयुष्य संपवलं होतं. ती महिला 27 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या व्यक्तीसोबत होती. त्याचा व्हिडीओ जगदीशने शूट केला होता आणि त्यावरून तो तिला ब्लॅकमेल करत होता, असं पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आलं. व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करून प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानंतर महिलेनं टोकाचं पाऊल उचललं होतं. तिच्या मृत्यूनंतर जगदीश काही दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या ‘पुष्पा’ फेम जगदीशची पोलिसांनी तुरुंगात रवानगी केली आहे.
जगदीशने ‘सत्थी गनी रेंदु येकारलु’ या छोट्या बजेटच्या ड्रामामध्ये काही दिवसांपूर्वी काम केलं होतं. याशिवाय तो नितीन आणि श्रीलीला यांच्या ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन’ आणि ‘अंबाजीपेटा मॅरेज बँड’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. यामध्ये जगदीशने अल्लू अर्जुनच्या खास मित्राची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.