राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील चर्चेत आले आहे. मराठा आरक्षणावरुन त्यांनी दोन वेळा उपोषण केले. त्यानंतर मराठा समाजास ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची केलेली मागणी लावून धरली आहे. यामुळे राज्यभरात मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मराठा समाजास आरक्षण दिले तर ओबीसी समाज नाराज आणि दिले नाही तर मराठा नाराज अशी परिस्थिती आहे. या प्रश्नावर संभाजीनगरमधील रिक्षा चालक विशाल नंदरकर याने तोडगा काढला आहे. ३८ वर्षीय नंदरकर यांनी एका स्टँपपेपरवर आपली मागणी लिहिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.का करावे मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री
शिवबा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी नायक चित्रपटाप्रमाणे मुख्यमंत्री करा, त्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा विषय सुटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यांच्याकडे फक्त मराठा आरक्षण हा विषय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री राहणार आहे. ज्या प्रमाणे राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री केले, त्याप्रमाणे मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे असे दोन जण मुख्यमंत्री म्हणून राहणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहे. यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.
सर्व पक्षांशी चर्चा करुन घ्या निर्णय
नंदरकर यांनी म्हटले की, राज्यातील सर्व पक्षांशी चर्चा करुन दुसरा मुख्यमंत्री नेमला पाहिजे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करताना मराठा, धनगर, मुस्लिम आणि ओबीसी हे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे काम दिले पाहिजे. मनोज जरांगे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ऐकतात. त्यामुळे मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांची चांगली मदत होणार आहे. नंदरकर यांनी हे निवेदन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. नंदरकर यांनी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली होती. ते ती पराभूत झाले होते.नायक चित्रपटाची स्टोरी काय?
नायक हा २००१ मध्ये आलेला चित्रपट आहे. त्या चित्रपटात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो. एका दिवसांत सर्व प्रश्न तो सोडवतो. त्याच्या कामाच्या पद्धतीची चर्चा राज्यभरात एका दिवसांत झाली होती.







