मनोज जरांगे पाटील यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. अनेक सभा होत आहेत. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. दिवसाला तीन ते चार सभा होत आहेत. रॅली होत आहे. प्रत्येक सभेत जरांगे पाटील तास ते दीड तास बोलत आहेत. आपला मुद्दा समाजाला समजावून सांगत आहेत.
आरक्षणाची गरजही व्यक्त करत आहेत. आज जरांगे पाटील यांचा दौरा लातूरला होता. लातूरच्या मुरुडमध्ये त्यांची भव्य रॅली पार पडली. या रॅलीत बोलत असतानाच अचानक जरांगे पाटील खाली बसले. त्यामुळे आयोजकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील मुरूडला आले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
नोज जरांगे पाटील यांनी या सभेतून आपल्या खणखणीत आवाजात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अत्यंत आक्रमक होत जरांगे पाटील बोलत होते. जरांगे पाटील यांचं भाषण जसजस संपत आलं तसतसा त्यांचा भाषणातील आवेश कमी झाला. जरांगे पाटील अचानक खाली बसले. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. आयोजकांच्या तर तोंडचं पाणीच पळालं. जरांगे अचानक खाली बसल्याने उपस्थितांमध्येही चलबिचल सुरू झाली. उभं राहून भाषण करणाऱ्या जरांगे यांना प्रचंड थकवा जाणवल्याने ते स्टेजवरच खाली बसले. पण खाली बसल्यावरही त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं होतं.
एक इंचही मागे हटणार नाही आज सकाळपासून जरांगे पाटील यांचा मराठा संवाद सुरू आहे. आराम न करता जरांगे पाटील दौरा आणि सभांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. राजकीय लोक त्यांच्या फायद्यासाठी फूट पडण्याची प्रयत्न करतील. मला जास्तीचे बोलता येणार नाही. परंतु आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही. या समाजाला आपले मायबाप मानले आहे. माझा परिवार माझा समाज आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, एकजूट फुटू देऊ नका. जाता जात तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण दुसऱ्यांनी खाल्ले मराठा समाजाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ही लढाई जिंकण्यासाठी ताकतीने उभे राहायचे आहे. मराठा समजाने ही लढाई काहीही झाले तरी जिंकायची आहे. मराठा समाजाने खूप बलिदान दिले आहे आहे. 70 वर्षा नंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. आरक्षणात येण्यासाठी सर्व निकष पूर्ण केले आहेत. 70 वर्षांपासून मराठ्यांचे लेकरे आरक्षणाची वाट पाहत होते. आपल्या आई-वडिलांनी जे स्वप्न बघितले ते साकार होण्याची वेळ आली आहे. आई-वडील रात्र दिवस पोर शिकवतात परंतु आरक्षण नसल्याने घात झाला. आरक्षण असताना दुसऱ्यांनी खाल्ले, असा दावा जरांगे यांनी केला.
24 डिसेंबरला आरक्षण मिळणारच मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही असे सांगत होते. आज या राज्यात 35 लाख लोकांच्या नोंदी सापडून आरक्षण मिळाले आहे आणि याच नोंदीच्या आधारे कायदा पारित होणार आहे. 24 डिसेंबरला आरक्षण मिळणार. 24 डिसेंबरला आरक्षण दिले नाही तर आपण सज्ज राहायचे. लढाई शांततेत करा. विजय मराठ्यांचा होणार आहे. काही जणांची भूमिका ही कोयता आणि कुऱ्हाडीची आहे. पण आपण शांततेत घ्यायचे आहे. त्याला तेढ निर्माण करायची असेल, पण आपण शांततेत घ्यायचे. आपण शांततेत आंदोलन करतो. परंतु त्यांची शांततेची भावना नाही. म्हणून तर आम्हाला जशास तसे उत्तर देतात, असंही ते म्हणाले.