भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात चुरशीचा खेळ रंगल्याचे पहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेने हा 5 विकेट्सने जिंकला असला तरी सर्वांचे लक्ष मात्र रिंकू सिंगवरच होते. त्याच्या एका दमदार सिक्सने मीडिया बॉक्सची काच फोडली.भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA T20) यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचा पहिला डाव बराच थरारक होता. टीम इंडियाने अवघ्या 6 धावांत आपले 2 फलंदाज गमावले होते. पण या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि स्टार फलंदाज रिंकू सिंग यांनी धुवांधार खेळी केली. कॅप्टन सूर्यकुमार यादव 56 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र रिंकू सिंग हा सामन्याच्या शेवटपर्यंत आपले पाय रोवून स्टेडियमवर उभा होता. त्याने नॉट आऊट राहून 68 धावा केल्या. मात्र याच खेळीदरम्यान त्याने एक असा षटकार लगावला, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. रिंकू सिंगने मारलेल्या या सिक्समुळे मीडिया बॉक्सची काचच फोडली. त्याच्या या सिक्सरची सोशल मीडियावर खूप चर्चा असून तो व्हायरल झाला आहे.दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खूपच खराब झाली. मात्र, सूर्यकुमार यादवने 56 धावांची खेळी करत आघाडी घेतली. पण रिंकू सिंगची खेळी चर्चेत राहिली. रिंकूने अवघ्या 39 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. हे दोन्ही षटकार त्याने 19व्या षटकात लागोपाठ मारले. यातील एक षटकार मीडिया बॉक्सच्या काचेला लागला, आणि काच खळ्ळकन फुटली. डाव संपल्यानंतर समालोचकही याबाबत चर्चा करताना दिसले. रिंकूच्या दोन षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पावसामुळे बिघडला भारताचा खेळ
हा दुसरा सामना पावसामुळे बिघडला. पावसामुळे भारताचा खेळ 3 चेंडूंआधीच संपला. टीम इंडियाने पावसाच्या एन्ट्री आधी 19.3 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकाने क्रिकेट टीम इंडियावर दुसऱ्या टी 20 सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान पाऊस आल्याने दक्षिण आफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 154 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 13.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली.