इचलकरंजी –
वडार समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी सुरु असलेल्या कोल्हापूर ते नागपूर वडार आरक्षण संघर्ष यात्रेचा शुभारंभ कोल्हापूरातून करण्यात आला. महाराष्ट्र वडार समाज अध्यक्ष मुकूंद पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरातून संघर्ष यात्रा निघाली असून कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष प्रमोद पोवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातून शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले आहेत.
विमुक्त वडार समाजाला ओबीसीमधून बाहेर काढून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना आदिवासींच्या सवलती लागू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी वडार समाजाचे नेते भरत विटकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला अभिवादन करुन ही यात्रा सुरु करण्यात आली. कोल्हापूर येथून निघालेली वडार आरक्षण संघर्ष यात्रा कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, तुळजापूर, बीड, अहमदपूर, नांदेडमार्गे नागपूर येथे पोहोचणार आहे.
15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथील छत्रपती चौक वर्धा रोडपासून विधानभवन नागपूर येथे पायी प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र वडार समाज अध्यक्ष मुकूंद पोवार यांच्या हस्ते वडार समाजाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. वडार समाजाला ओबीसीतून बाहेर काढून त्यांना आदीवासींच्या सवलती देण्यात या मागणीसाठी वडार आरक्षण संघर्ष यात्रा सुरु असून 15 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर निघणार्या प्रचंड मोर्चात महाराष्ट्रातील वडार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि वडार समाजाला आदिवासींच्या सवलती मिळवून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुकूंद पोवार यांनी केले आहे.
याप्रसंगी राजू वडार-भादोलेकर, सतिश कुर्हाडे (कागल), अविनाश पोवार, प्रविण कुर्हाडे, मारुती बुनांद्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.