महाराष्ट्र पोलीस दलात नवीन वर्षांत मोठे बदल होणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. रजनीश शेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष करण्यात आले आहे. यामुळे आता राज्याच्या पोलीस दलाचे नेते कोण होणार? हे नवीन वर्षांत ठरणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी कोणाची नियुक्ती करावी? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. महासंचालक पदासाठी मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर हे स्पर्धेत आहेत.रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची शक्यता
राज्याचे गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे महासंचालकपदासाठी त्यांचे पारडे जड आहे. आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता शुक्ला यांच्या गळ्यात महासंचालकपदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. परंतु मुंबईला आणि राज्याच्या पोलीस दलास नव वर्षात नवे नेतृत्व मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी हे निर्णय होणार आहे. मुंबईच्या आयुक्तपदी जगजीत सिंह यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.