एकीकडे संपूर्ण देशभर नवीन वर्षाचे स्वागत केले जात असतांना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील घडलेल्या काही दुर्दैवी घटनांनी खळबळ उडाली आहे. आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने अवघ्या पंधरा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू (Death) झाला आहे. शहरातील उस्मानपुरा भागात ही घटना घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मयत चिमुकलीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, अजिम सय्यद हे शहरातील उस्मानपुरा भागात राहतात. त्यांना 15 महिन्याची नुरेन नावाची मुलगी होती. दरम्यान, नुरेनाच्या वडिलांसाठी आईने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. मात्र, पाण्याचे पातेले अंगावर पडल्याने नुरेना गंभीर भाजली. आई-वडिलांनी तिला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने सय्यद कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर, परिसरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.