उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे”,अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. त्यांना पारदर्शकपणे काम करु दिले जात नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडलय.ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलीये. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलंय, असा दावाही सुळे यांनी केला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबीयांचे मोठे योगदान (Supriya Sule On Prakash Ambedkar)
सुप्रिया सुळे म्हणाल्या,गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबीयांनी मोठं योगदान दिलंय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही चांगल्या पद्धतीने काम केलंय. संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. नव्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन करावे. इंडिया आघाडीतही त्यांचा मोठा रोल असणार आहे, असा मला विश्वास आहे. संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे.फक्त त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. अनेक महिन्यांपूर्वीचं हा फॉर्म्युला दिल्लीत ठरला होता. लवकरच महाविकास आघाडी जागावाटपाबाबत निर्णय घेईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. मी लहान कार्यकर्ती आहे. सध्या तरी जनतेची सेवा आणि लोकसभेतील सहभाग यावरच माझा सहभाग आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले जातायत – सुप्रिया सुळे
महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत. गुंतवणूक होत नाहीये. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. यावर महाराष्ट्रातील ट्रीपल इंजिन सरकार गप्प आहे. खोके सरकारकडे 200 आमदार असूनही महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायावर कोणीही बोलत नाही,अशी टीका सुळे यांनी केली.
लोकसभेच्या निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात
सुळे म्हणाल्या, जगभरातील अनेक देशांमध्ये 2024 मध्ये निवडणुका होणार आहेत. आपल्या देशातील निवडणुका पारदर्शकपणे आणि कोणत्याही दडपशाही विना पार पडल्या पाहिजेत. हे वर्ष सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं वर्ष आहे. ईव्हीएमबाबत विदेशात शंका घेतल्या जात असतील तर पीएम मोदींनी (PM Narendra Modi) सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर बोलायला हवे. ते फक्त भाजपचे नाहीत तर देशाचे पंतप्रधान आहेत. कॉपी करुन पास होण्यापेक्षा अभ्यास करुन पास झालेले केव्हाही चांगले असते, असा टोलाही ईव्हीएमवरुन सुळे यांनी लगावला.