ताजी बातमी /ऑनलाइन टीम
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. दरम्यान आज (दि. २५) दुपारी राधानगरी धरण पूर्ण भरले. त्यानंतर दुपारी ३.५५ वाजता ३ व ६ क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. यावेळी एकूण ४ हजार २५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
राधानगरी धरणाची पाणी पातळी दुपारी ३.५५ वाजता ३४७.४५ फूट आहे. गेट ओपन होण्यासाठी अजून ०.०५ ने पाणी पातळी कमी आहे व पाऊस २५ मिमी आहे. तसेच गेट क्र. ६ व ३ खुले झाले आहेत. त्यामधून प्रत्येकी १४२८ क्युसेक्स प्रमाणे २८५६ व पॉवर हाऊसमधून १४०० असा एकूण ४२५६ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने भोगावती सह पंचगंगा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री विक्रमी 56.3 फुटांवर असलेली राजाराम बंधार्याची पाणी पातळी शनिवारी रात्री 10 वाजता 53 फुटांवर आली. तर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास 51 फुटांवर आली.
चिखली गावाला पुराचा वेढा असून, ‘एनडीआरएफ’चे पथक नागरिकांना स्थलांतरित करत आहे.
दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्गावर अजूनही पाणी असून, वाहतूक बंदच आहे.