आर्थिक गरजू, कर्जबाजारी लोकांना हेरून त्यांना तीन पट बनावट नोटा छापून देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या आंतरराज्य टोळी सोमवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने उजेडात आणली. अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द ) या उबाठा शिवसेनेचा माजी कागल तालुकाप्रमुख या टोळीचा सूत्रधार आहे.
त्याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास ( वय ४१ बेळगाव) व सलील रफिक सय्यद (वय ३०, गोकाक बेळगाव) यांना अटक केली असून या तिघांना ११ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथील उमेश तुकाराम शेळके हे कर्जबाजारी झाले होते. कर्ज फेडण्याचेच्या विवंचनेत ते असताना त्यांना सरकवास हिने गाठले. शेळके यास एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाखाच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले. या माहितीच्या आधारे अशोक पाटील याच्या बेलवडे खुर्द येथील फार्म हाऊस वर छापा टाकला.
कर्नाटकातही कारवाई
तेव्हा सरकवास व सय्यद हे दोघे शेळके यांना बनावट नोटा छापण्याचे प्रात्यक्षिक दाखवत होते. या सर्वांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या साहित्यासह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यापूर्वी अशोक पाटील याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.