येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील रवी रोहिदास काळे (वय 42) यांच्यावर दोघांनी कोयत्याने हल्ला करून जखमी केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यूू झाला. संशयित दोघांना अटक करण्यात आली.सोमवारी रात्री ही घटना घडली होती. रोहित रवी सकट (वय 24, रा. इंदिरानगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर दुसरा संशयित अल्पवयीन आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येथील इंदिरानगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री झालेल्या खुनीहल्ल्यातील गंभीर जखमी रवी काळे यांचा मंगळवारी पहाटे उपचारावेळी मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
काळे मजुरीचे काम करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा संशयितांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. संशयितांनी त्यांना ‘तुला बघून घेतो’, अशी धमकी दिली होती. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. काळे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता जेवण करून इंदिरानगरमधील अण्णा भाऊ साठे कट्ट्यावर बसले होते. संशयित तिथे आले. त्यांनी पूर्वी झालेला वाद उकरून काढला. यातून त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.
संशयितांनी कोयता काढून काळे यांच्यावर हल्ला केला. डोक्यात, छातीवर वार केले. यामध्ये ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतरही संशयितांनी त्यांच्या उजव्या पायावर वार केले. ते आरडाओरड करू लागले. परिसरातील लोक जमा होताच संशयित पसार झाले. काळे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनकचउपचार सुरू असताना त्यांचा पहाटे चार वाजता मृत्यू झाला.
विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत काळे यांचा मुलगा विशाल याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच इंदिरानगरमधील नागरिकांनी रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. विच्छेदन तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देेण्यात आला.