छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून रामेश्वर चौकातून रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारामुळे समोरून येणाऱ्या दुसरा दुचाकीवरील तरूण डंपर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दुचाकीस्वार व डंपरचालकास अटक केली आहे.
शुभम दादाभाऊ डोके (वय २१, रा. मगरपट्टा, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आलेला दुचाकीस्वार अभिजीत चांदणे (वय ४०, रा.तळजाई वसाहत) व डंपरचालक कमलदेव कैलास महतो (रा. झारखंड) यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवार वाड्याकडून स्वारगेटच्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू आहे. रामेश्वर चौकातून दत्त मंदिराकडे वाहनांना जाण्यासाठी बंदी आहे. असे असतानाही अनेक दुचाकीस्वार, रिक्षा, टेम्पो यांसारखी वाहने सर्रासपणे विरूद्ध दिशेने प्रवास करतात.
मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शुभम हा दत्त मंदिराजवळील रस्त्यावरून रामेश्वर चौकाच्या दिशेने जात होता. त्याच्या जवळूनच डपंरही रस्त्याने जात होता. त्याचवेळी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून अभिजीत चांदणे हा त्याच्या दुचाकीवरून रामेश्वर चौकातून विरुद्ध दिशेने जाण्यासाठी वळला.शुभमने त्याच्या दुचाकीला ब्रेक लावून दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी घसरून त्याचा तोल गेल्याने तो रस्त्यावर पडला. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या डंपरचे पाठीमागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने शुभमचा जागीच मृत्यु झाला.
गणपतीचे दर्शन घेऊन निघालेल्या शुभमवर काळाचा घाला
शुभम डोके हा औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत होता. शुभम दर मंगळवारी सकाळी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात येत होता. नेहमीप्रमाणे तो मंगळवारी सकाळी दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन निघाल्यानंतर काही अंतरावरच त्याचा अपघात होऊन मृत्यु झाला. शुभमचे आई वडील शिक्षक आहेत.