पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत देशातील दोन कोटी महिलांना लखपती करण्याचा त्यांचा निर्धार व्यक्त केला. देशातील सर्वात मोठ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पंतप्रधानांनी चौफेर फटकेबाजी करतानाच त्यांच्या महत्वकांक्षी योजनांची उजळणी केली. आता देश बदलत आहे आणि पुढे जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2 कोटी महिलांना श्रीमंत करण्याचा हा कोणता फॉर्म्युला आहे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. लखपती महिली ही योजना आहे तरी काय, जाणून घ्या…
काय आहे ही योजना
लखपती दीदी योजना असे या योजनेचे नाव आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी तिची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केली होती. महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थात काही राजे ही योजना त्यापूर्वीच राबवित होती.अशी आहे योजना
ही योजना काही राज्यांमध्ये 4 नोव्हेंबर 2022 रोजीपासूनच सुरु झालेली आहे. तर गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारने देशातील दोन कोटी महिलांना लखपती करण्यासाठी ही योजना अंगिकारली. या योजनेत महिलांना सुक्ष्म कर्जाची (Micro Credit) सुविधा देण्यात येते. महिलांना उद्योग, शिक्षण आणि इतर गरजांसाठी अल्प कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. ज्या स्त्रियांकडे गहाण ठेवण्यासाठी काहीच नाही, अशा महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे.
प्रशिक्षण पण मिळणार
या योजनेत कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर अधिक भर आहे. त्यामुळे महिलांना प्रशिक्षण पण देण्यात येणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करु पाहणाऱ्या महिलांना आर्थिक पाठिंब्यासोबतच बाजाराची अपडेट देण्याचे काम या योजनेत करण्यात येत आहे. यामध्ये प्लम्बिंग, एलईडी बल्ब, ड्रोन अशा अनेक व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येते.
कागदपत्रे काय लागतात
लाभार्थ्याचे आधारकार्ड
पॅनकार्डची फोटोकॉपी
बॅकेचे पासबुक झेरॉक्स
शैक्षणिक कागदपत्रे
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट आकाराचा फोटो
योजनेसाठी कोण पात्र
बचतगटाच्या सदस्य महिलांना योजनेचा लाभ
लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न योजनेप्रमाणे कमी असावे
लाभार्थी महिलेला प्रशिक्षण घेण्याची तयारी असावी
अर्जदार ही भारताची नागरीक असावी