सध्या आपलं सगळं जगणं मोबाइल फोन या एका गोष्टीभोवती फिरतं. खरेदी, बिलं भरणं, गेमिंग, मीटिंग्ज, ऑफिसचं काम असं सगळं आपण मोबाइलवरून करतो. त्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते अर्थातच इंटरनेट.ही सगळी कामं नीट व्हायला हवी असतील तर इंटरनेटचा स्पीड चांगला असणं महत्त्वाचं आहे. फोनवर इंटरनेट नीट चालावं, ते स्लो झाल्यामुळे कुठलंही काम अडू नये यासाठी काय करायचं.
फोनवर चालणाऱ्या इंटरनेटचा स्पीड कमी झाला की फोनवरचा कॅश डेटा क्लीन करणं आवश्यक आहे. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल आणि स्पेसही मोकळी होईल. मोबाइलमध्ये एकाच वेळी अनेक ॲप्स सुरू राहत असतील तरी इंटरनेट स्लो होऊ शकतं. त्यामुळे जी ॲप्स वापरत नाही आहात ती बंद करा. ती बंद करण्याचा शॉर्टकट प्रत्येक फोनमध्ये वेगळा असतो. तुमच्या फोनमध्ये तो कुठे आहे हे तपासून घ्या आणि अवघ्या काही सेकंदांत फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड वाढवा, म्हणजे तुमची कामं झटपट होतील.
सहसा मोबाइल फोनवर कुठलीही अडचण आली तर फोन स्विच ऑफ करून पुन्हा ऑन केला असता तो सुरळीत होतो. फोन रिस्टार्ट केला तरी बरेचदा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यामुळे हे दोन पर्याय नक्की लक्षात ठेवा.
फोनवर बराच वेळ इंटरनेट येत नसेल किंवा ते स्लो चालत असेल तर फोन एअरोप्लेन मोडवर किंवा फ्लाइट मोडवर टाका. हा मोड बंद केल्यावर फोन आपोआप रिफ्रेश होईल आणि इंटरनेटचा वेगही सुधारेल. एअरोप्लेन मोडवर फोन टाकल्यानंतर फोन येणं, मेसेज येणं हे सगळं बंद होत असल्यामुळे या वेळेत फोन नवी ऊर्जामिळवतो आणि त्याचा उपयोग इंटरनेट पुन्हा स्पीड अप होण्यासाठी होऊ शकतो. काही मोबाइल फोन्समध्ये हा मोड फ्लाइट मोड या नावाने दिला जातो. तुमच्या फोनमध्ये तो काय नावाने दिला आहे याची माहिती करून घ्या आणि गरजेप्रमाणे वापर करा.
आयफोन आणि ॲंड्रॉइड फोनमध्ये मोबाइल डेटा रिस्टार्टचा एक पर्यायही दिला जातो. तो वापरताना आधी तुमचा डेटा बंद तरा आणि काही सेकंदांनी पुन्हा सुरू करा. त्यामुळेही तुम्हाला मोबाइल इंटरनेटचा स्पीड चांगला मिळू शकेल. याबरोबरच तुमच्या फोनमध्ये थोडी स्पेस सतत मोकळी ठेवा. त्यामुळेही फोनवर इंटरनेट चांगल्या स्पीडला चालेल.