मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुढच्या दोन दिवसांनी म्हणजेच 20 जानेवारीपासून त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी रवाना होणार आहेत. त्यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. पण मनोज जरांगे सरकारचं ऐकून घेण्यास तयार नाहीत. जोपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे हे आंदोलन खूप मोठं होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वच जिल्ह्यात शिबिर भरवून प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. राज्यात 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना तातडीने मोठ्या प्रमाणात राज्यभरात शिबीर राबवून प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. त्यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या कामाला गती मिळणार आहे. मुख्य सचिवांच्या या आदेशावर मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. पण तरीही त्यांनी एक अट सरकारपुढे ठेवली आहे.