आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात 7 हजाराची आणि गटप्रर्वतकांच्या(volunteers) मोबदल्यात 10 हजार रुपयांची वाढ केल्यासह मान्य केलेल्या मागण्यांचा अध्यादेश शासनाने तातडीने काढावा. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करावेत या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तातडीने अध्यादेश जारी न केल्यास लोकप्रतिनिधींच्या गाड्या रस्त्यातच अडविल्या जातील असा इशाराही देण्यात आला. संघटनेच्या वतीने दिलेले निवेदन ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे व प्रकाश मोरे यांनी स्विकारले.
विविध न्याय(volunteers) मागण्यांसाठी 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाची दखल घेत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव व आयुक्त आरोग्यसेवा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते. परंतु त्याचा अध्यादेश न निघाल्याने शनिवारी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्याच अनुषंगाने आज ताराराणी पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळीपूर्वी 2 हजार रुपये दिवाळी भेट, आशा स्वयंसेविकांना 7 हजार आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची वाढ करण्यासह गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचार्यांमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एचडब्ल्यूसी चे मानधन जमा करावे आणि संपकाळातील मानधनात कपात करण्यात येऊ नये आदी मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.
त्याचा अध्यादेश तातडीने जारी करण्यात यावा आणि अंमलबजावणी व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या आंदोलनात उज्वला पाटील, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष जाधव, राधिका घाटगे, कविता पाटील, विद्या जाधव, दिपाली भोसले, सारीका पाटील, संगिता कांबळे, मनिषा मोरे, संगिता कामते, छाया काळे, पुनम माळी आदींसह आशा स्वयंसेविका व गटप्रतर्वक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बाळासाहेब कलागते, राजेंद्र बचाटे, नजमा शेख, सुवर्णा लाड, रमेश पाटील उपस्थित होत.