वाढत्या महागाईची झळ सामान्यांना पोहोचू नये, यासाठी भारत सरकारने बाजारात स्वस्त धान्य उपलब्ध केलं आहे. त्याअंतर्गत गव्हाचं पीठ, तांदूळ, हरभरे सामान्यांना स्वस्तात विकत घेता येऊ शकतातभारत आटाची किरकोळ किंमत 27.50 रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आलीय.
हे गव्हाचं पीठ केंद्रीय भांडार, NCCF आणि NAFED च्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला ऑनलाइन खरेदी करायची असल्यास जिओमार्टवर सरकारी दरातच हे पीठ मिळू शकतं.
गेल्या काही महिन्यांत महागाई वाढल्यानं सरकारनं सामान्यांसाठी स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिलं. 2023च्या नोव्हेंबरमध्ये भारत आटा पीठ मिळण्यास सुरुवात झाली, तर सहा फेब्रुवारीपासून भारत तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने मिळत आहेत. गव्हाचं पीठ अर्थात आटा 27.50 रुपये प्रति किलो दरानं मिळत आहे.
सरकारी योजनेतलं हे गव्हाचं पीठ केंद्रीय भांडार, NCCF आणि NAFED च्या दुकानांमध्ये मिळतं. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारत आटाच्या 100 मोबाइल व्हॅन्सना हिरवा कंदील दाखवला होता. सरकारने गेल्या वर्षी दिवाळीच्या आधीच स्वस्त पीठ उपलब्ध करून दिलं होतं.
आता हे पीठ ऑनलाइन पद्धतीनंही खरेदी करता येऊ शकतं.जिओमार्टच्या https://www.jiomart.com/p/groceries/baharat-atta-10kg-pp/607008444 या लिंकवरही भारत आटा उपलब्ध आहे. त्याच्या 10 किलोच्या पॅकची किंमत 275 रुपये आहे. थोडक्यात सरकारी दरानुसारच त्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे. स्मार्ट बाजारच्या माध्यमातून हे गव्हाचं पीठ तुम्हाला मिळू शकेल. दिल्लीच्या बहुतांश भागात हे गव्हाचं पीठ दोन दिवसांत घरपोच मिळत आहे.
ब्लिंकइट या ऑनलाइन ग्रोसरी साइटवर आशीर्वाद आट्याची किंमत 10 किलोला 408 रुपये आहे. म्हणजेच प्रति किलो साधारणपणे 40 रुपयांचा दर आहे. सरकारी योजनेत मात्र गव्हाचं पीठ 27.50 रुपये प्रति किलो दरानं मिळतंय. त्याशिवाय दर्जाबाबतही सरकारकडून खात्री देण्यात आलीय. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार यांना 2.5 लाख टन गहू अवघ्या 21.50 रुपये प्रति किलोच्या दरानं उपलब्ध करून दिला.
त्यामुळेच स्वस्तात गव्हाचं पीठ देण्याकरिता या तिन्ही यंत्रणांनी गव्हाचं पीठ दळून ते 27.50 रुपये प्रति किलोने विकायला सुरुवात केली.सरकारनं स्वस्तात गव्हाचं पीठ उपलब्ध करून दिल्यानं गव्हाची साठेबाजी करणाऱ्यांची कोंडी झाली. अडीच लाख टन गहू पीठ बाजारात उपलब्ध झाल्यानं गव्हाचा साठा करणाऱ्यांवर नियंत्रण राहील व गव्हाचे दर फार वाढणार नाहीत.