गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं कपल रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. काल ( 21फेब्रुवारी) या जोडप्याने गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केले. रकुल प्रीत आणि जॅकीने प्रथम शीख रितीरिवाजांनुसार आनंद कारज सेरेमनी फॉलो करत लग्न केले आणि नंतर सिंधी रितीरिवाजांनुसार त्यांनी पुन्हा लग्न केले. या लग्नासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी याशिवाय बॉलिवूडमधील अनेक कलाकारही आवर्जून उपस्थित होते. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचे लग्न दोन्हीकडच्या रितीरिवाजांनुसार झालं.
3 फेब्रुवारीपासूनच या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. 3 फेब्रुवारीला रकुल प्रीत सिंगने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नापूर्वीचा अखंड पाठातील एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये तिने डोक्यावरून जांभळ्या रंगाची ओढणी घेतली होती. तिच्या व जॅकीच्या लग्नाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आधी ते देशाबाहेर लग्न करणार होते, नंतर त्यांनी व्हेन्यू बदलत गोवा हे डेस्टिनेशन लग्नासाठी निवडले.
सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतला आशिर्वाद
लग्नासाठी गोव्याला जाण्यापूर्वी मुंबईत त्यांच्या लग्नाची काही फंक्शन्स पार पडली. 16 फेब्रुवारी रोजी जॅकीच्या घरी ढोल नाईट पार पडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जॅकी आणि रकुल दोघेही सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. लग्नापूर्वी त्यांनी गजाननाचे दर्श घेऊन बाप्पाच्या चरणी लग्नपत्रिकाही ठेवली.
त्यानंतर 18 फेब्रुवारीला रकुल आणि जॅकी लग्नासाठी गोव्याच्या दिशेने रवाना झाले. 19 फेब्रुवारीपासून त्यांच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले. पहिले त्यांचा हळदी समारंभ झाला, त्यानंतर होणाऱ्या वधूच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या संगीतमध्ये जॅकी आणि रकुलेने जोरदार डान्स करत आनंद लुटला.
मुंबईत पार पडणार रिसेप्शन ?
गोव्यातील विवाहसोहळ्या नंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी मुंबईत लवकरच एक ग्रँड रिसेप्शन देणार असल्याचे वृत्त आहे. या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. वरुण धवन पत्नी नताशा दलालसोबत लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. तसेच, अर्जुन कपूर, रवी किशन, आयुष्मान खुराना, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यासह दिग्गज बॉलिवूड स्टार्स गोव्यात पोहोचले आणि त्यांनी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला हजेरी लावत नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छाही दिल्या.