महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात शनिवारी हाय व्होल्टेज सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सविरुद्ध सात गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. हरमनप्रीतने अवघ्या 48 चेंडूत नाबाद 95 धावा केल्याने मुंबई इंडियन्सने 191 धावांचे लक्ष्य एका चेंडू राखून पार केले.
यासोबत गतविजेत्या एमआयने शनिवारी संध्याकाळी गुजरात जायंट्सचा पराभव करून प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. आणि गुजरात जायंट्सचा प्रवास इथेच संपला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात हा पहिला संघ ठरला आहे.
महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आणि संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सचा 6 सामन्यांमधला पाच सामने हारला आहे. गुजरात 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या पाचव्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, RCB 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि UP वॉरियर्स समान गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
WPL 2024 प्लेऑफ समीकरण :
आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त दोन जागा बाकी आहेत. आणि यासाठी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात लढत आहे. गेल्या मोसमातील उपविजेत्या दिल्लीने उरलेल्या दोनपैकी एकही सामना जिंकला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचेल.
आरसीबीला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. यूपीचा प्लेऑफचा मार्ग थोडा कठीण आहे, कारण संघाला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. यासोबत त्यांना आरसीबीच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल, कारण त्यांचे नशीब आता त्यांच्या हातात नाही.