मराठा आरक्षणाच्या(reservation system) मागणीसाठी जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे उपोषणासाठी गेले होते. यावेळी मुंबईकडे जात असताना त्यांनी विविध भागात सभाही घेतल्या होत्या. या दरम्यान, पुण्यातील वाघोलीमध्ये विना परवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांवर दीड महिन्यांंनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या(reservation system) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई असा प्रवास केला होता. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाहीर सभाही घेतल्या होत्या. या यात्रेदरम्यान २३ जानेवारी रोजी वाघोली येथे त्यांचा मुक्काम होता. या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभाही पार पडली होती.
याठिकाणी मनोज जरांगे यांची पहाटे तासभर सभा झाली होती. यादरम्यान, आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील लोणीकंद पोलीस ठाण्यात जरांगे पाटील यांच्यासह ८- १० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. बीडमध्ये ही सभा होणार आहे.