पुण्यात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा फटका बसला. वसंत मोरे यांनी काल मनसेला सोडचिठ्ठी दिली. 18 वर्षापासूनची मनसेची साथ त्यांनी सोडली. वेगळ्या वाटेवरुन चालणार असल्याच वसंत मोरे यांनी जाहीर केलं. पक्ष सोडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वसंत मोरे भावूक झाले होते. त्यांचे डोळे पाणावले होते. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती. म्हणून अखेरीस खेदाने पक्ष सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असं वसंत मोरे म्हणाले. वसंत मोरे मागच्या एक ते दीड वर्षांपासून पक्षात नाराज होते. सतत त्यांच्या अस्वस्थततेच्या बातम्या येत होत्या.
व्हॉट्स अप स्टेटसमधून ते मनातील खदखद, भावना व्यक्त करत होते. त्यावरुनच पुणे मनसेमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत होते. अखेरीस काल मंगळवारी वसंत मोरे यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. माझा वाद राजसाहेबांसोबत नव्हता. पुण्यात माझ्याविरोधात जे राजकारण झालं, त्याला कंटाळून मी राजीनामा देत असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान वसंत मोरे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल? ते कुठल्या पक्षासोबत जातील या बद्दल विविध तर्क-वितर्क, अंदाज वर्तवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. सध्या भाजपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजी नगरसेवक राहिलेल्या वसंत मोरे यांनी आपली राजकीय महत्वकांक्षा लपवून ठेवली नाही. पुण्यातून त्यांना मनसेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती.
‘माझ्या आईला दुःख झालं, तिच्या डोळ्यात पाणी आलं’
दरम्यान वसंत मोरे यांच्याशी दोन पक्षांनी संपर्क साधला आहे. स्वत: वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. “काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे, माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता तसच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा त्यांना ऑफर दिली आहे” असं ते म्हणाले. “मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. कुणाकडून लढणार ते लवकरच जाहीर करणार, कालच्या निर्णयामुळे माझ्या आईला दुःख झालं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला राज ठाकरेंशी बोलायचं नाहीय. अविनाश जाधव यांनी काही बोलू नये, अन्यथा मलाही बोलावं लागेल आणि लवकरच त्यांच्या टीकेला उत्तर देणार” असं वसंत मोरे म्हणाले.