ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते.
या दोघांची नियुक्ती गुरुवारी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. ही बैठक 40 मिनिटे चालली. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते. त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला.
आता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे.