Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रव्हेल माशाची 19 कोटींची उलटी जप्त, मिरजमध्ये कारवाई; तिघांना अटक

व्हेल माशाची 19 कोटींची उलटी जप्त, मिरजमध्ये कारवाई; तिघांना अटक

माशाच्या उलटीची तस्करी करणाऱया तिघांना मिरज शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तब्बल 19 कोटी 24 लाख रुपये किमतीची उलटी जप्त केली आहे. सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता मिरज-म्हैसाळ रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.जवळपास 19 किलो 172 ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीच्या तीन लाद्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

 

मंगेश माधव शिरवडेकर (वय 36, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), संतोष ऊर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (वय 35, रा. वायरी, ता. मालवण), वैभव रामचंद्र खोबरेकर (वय 29, रा. कवठे कुडाळ, देवबाग) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार फरार आहे.

 

मिरजेतून कर्नाटकात तस्करी करण्यात येत असलेली आणि जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी मिरज पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई मिरज शहर, गांधी चौक व मिरज वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या वन विभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली, असे फुलारी यांनी सांगितले.

 

मालवण येथून व्हेल माशाच्या कोटय़वधी रुपयांच्या उलटीची तस्करी मिरजेतून केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सर्व संशयित एका कारमधून मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील वांडरे कॉर्नरजवळ येणार असल्याची खबर पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी मिरजेत सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कार वांडरे कॉर्नरजवळ आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली.या तिघांकडून व्हेल माशाची उलटी आणि त्याची तस्करी करण्यासाठी वापरलेली सहा लाख 80 हजार रुपयांची कार असा 19 कोटी 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, हवालदार वैभव पाटील, सचिन सनदी, नीलेश कदम, संदीप मोरे यांनी या कारवाईत भाग घेतला.

 

तस्करीसाठी मोठी साखळी कार्यरत

 

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी फार मोठी साखळी सध्या कार्यरत आहे. यापूर्वी जिह्यात व्हेल माशाची उलटी जप्त केली होती; परंतु आजपर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. सिंधुदुर्गमधून या उलटीची सर्वाधिक तस्करी होते. त्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती अद्यापि लागलेला नाही. परंतु अटकेतील तिघांच्या माध्यमातून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -