महायुतीत जाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली. त्यानंतर आता राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे येथील हॉटेल ताज लँडमध्ये बैठक सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीत आणखी एक भिडू येणार आहे. तीन पक्षांची महायुती आता चार पक्षांची होण्याची शक्यता आहे. मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीत जाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली. त्यानंतर आता राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे येथील हॉटेल ताज लँडमध्ये बैठक सुरू आहे. हॉटेलच्या 19 व्या मजल्यावर हे नेते जमले असून त्यात जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनसेचा महायुतीतील प्रवेश निश्चित झाल्याचंही मानलं जात आहे.
हॉटेल ताज लँड एंडच्या 19 व्या मजल्यावर राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. मनसेला किती जागा द्यायच्या याची जुळवाजुळव सुरू आहे. लोकसभेसाठी युतीच समीकरण कसं जुळवायचं यावर चर्चा सुरू आहे. मनसे सोबत आल्यावर महायुतीचा कार्यक्रम कसा असेल हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेला हव्यात दोन जागा
दरम्यान, मनसेला दोन जागा हव्या असल्याचं सांगितलं जात आहे. शिर्डी किंवा नाशिक आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर मनसेने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांना या जागा दिल्या जातात का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेला दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डीची जागा सोडली तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर उभे राहण्याचे सांगितलं जात आहे. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वीच मनसेने मोठी सभा घेतली होती.
28 जागांमधून जागा मिळणार
भाजपने महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे 28 जागा उरल्या आहेत. या 28 जागांमधील काही जागा भाजपच्या आहेत. तर उरलेल्या जागा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देण्यात येणार आहेत. त्यातूनच मनसेला दोन जागा सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीत मुंबईतील जागांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे मुंबईतील एखादी जागा मनसेला जाण्याची शक्यता आहे. मनसेचा बेस मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि औरंगाबादेत आहे. त्यामुळे या जागा मनसेला यातीलच दोन जागा दिल्या जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, आजच्या बैठकीनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असंही सांगण्यात येत आहे.